राज्यातील 50 टक्के लोक उदरनिर्वाहासाठी शेती व संलग्न सेवांवर अवलंबून असल्याने शेतीची उत्पादकता व उत्पादन वाढविणे हे ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे अंग आहे. सिंचनाचा मूलभूत उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ करून ग्रामीण जीवन समृद्ध करणे हा आहे. कृषी क्षेत्राच्या उत्पादकतेमध्ये सिंचन व्यवस्थेचा वाटा महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्रात लहान-मोठ्या मिळून जवळजवळ 400 नद्या वाहतात. त्यांची एकंदर लांबी सुमारे 20 हजार कि.मी. आहे. परंतु सगळ्या नद्या बारामही नसल्याने सिंचनाचा प्रमुख स्त्रोत म्हणुन राज्यातील पाटबंधारे सुविधांचा प्रामुख्याने विचार होतो.
केंद्रीय जल आयोगाच्या एका अहवाला अनुसार देशात पूर्ण झालेली व काम सुरू असलेली अशी एकूण 5, 101 धरणे आहेत. त्यापैकी सर्वाधिक 2,821 (35.7 टक्के) धरणे महाराष्ट्रात आहेत. असे असले तरी राज्यातील पिकाखालील क्षेत्रापैकी 17.9 टक्केच क्षेत्र सिंचनाखाली आहे. राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 45.3 टक्के एवढे अधिक आहे. भ्रष्टाचाराच्या वेढ्यात गुरफटलेल्या राज्यातील सिंचन क्षेत्रासंबंधी येथे विस्ताराने चर्चा केली आहे.